विपश्यना–मानवते साठी एक अमूल्य देणगी

"अत्ता ही अत्तनो नाथो अत्ता ही अत्तनो गति" 

अर्थात: मीच माझा मालक आहे, मीच माझा भाग्य विधाता आहे--गौतम बुद्ध, धम्मपद, गाथा ३८०


मी गेल्या 15 वर्षांहून अधिक काळ, पूजनीय  एस.एन. गोयंका जी आणि त्यांचे गुरु सयाजी उ बा खिन यांनी शिकवलेल्या विपश्यना ध्यानाची साधना करीत आहे. माझ्या ​वडिलांनी वयाच्या १७ व्या वर्षी मला युवकांच्या (टीनएजर) कोर्सला बसवून माझी आणि विपश्यना ची ओळख करून दिली. त्यावेळेस मी नुकताच अमेरिकेहून एक वर्षाचा 'रोटरी यूथ कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम'  पूर्ण करून आलो होतो आणि ‘रिवर्स कल्चरल शॉक’ (विपरीत संस्कारांचा धक्का) च्या अनुभवाने अस्वस्थ होतो. माझ्या गावातल्या  वातावरणात, जिथे मी लहानाचा मोठा झालो होतो, तेथे परत रुळणे मला कठीण जात होते. पाश्चिमात्य देशाच्या मोहजाळात ​अडकून मी माझ्या सांस्कृतिक मुळापासून दूर गेल्यामुळे, बराच काळ माझे स्वतःचे कुटुंब आणि मित्रपण मला परके झाले होते.

अशा अशांत पार्श्वभूमीवर आचार्य गोयन्काजी आणि समवयस्क साधकांच्या शुभ सहवासात घालवलेले ते मौन ध्यान साधनेचे सात दिवस, माझ्या आयुष्यातल्या सर्वात गंभीर आणि महत्वपूर्ण परिवर्तनाला कारणीभूत ठरले. त्या युवा शिबिरात मला अनायासे माझ्या अहंकाराच्या संपूर्ण विघटनाचा साक्षात्कार घडला आणि मी सर्व जीवांसाठी अपार कृतज्ञता आणि प्रेमाने भारून गेलो. तो अनुभव क्षणिकच होता पण मला एका विस्तृत अस्तित्वाची जाणीव करून गेला. विपश्यनेआधी ही गोष्ट माझ्या तर्कशुद्ध (rational) मनाच्या आकलनापलीकडची होती.

त्यानंतर माझ्या धर्म मार्गावरील  प्रवासाला उत्तरोत्तर चालना मिळत गेली. मी  नुकतेच माझे प्रथम वीस दिवसीय विपश्यना शिबीर पूर्ण केले आणि या सुंदर मार्गाबद्दलचे सार तुमच्या पुढे मांडण्याची स्फूर्ति मला मिळाली. मला आशा आहे की हा माझा अनुभव इतर ईच्छुकांना ह्या मार्गावर चालण्यास आणि प्रगती  करण्यास  प्रेरणा देईल. 

हा मार्ग साधा असला तरी कठीण आहे. याला  शब्दात व्यक्त करणे सोपे नाही कारण प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असतो आणि त्याप्रमाणे शब्दांचे अर्थ बदलू शकतात. तरी मी नम्रपणे पुढील शब्दांत ते मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

"विपश्यना, ज्याचा अर्थ आहे यथा-भूत ज्ञान दर्शन म्हणजे जे जसे आहे त्याला तसेच पाहणे, त्याच्या खऱ्या स्वरूपात पाहणे; ही ध्यानाच्या सर्वात प्राचीन विधीं मधील एक आहे. विपश्यना ही स्वदर्शनातून स्वतः मध्ये बदल घडवण्याची कला आहे. जस-जसे आपण शरीरात होणाऱ्या बदलांना, जे संवेदनांच्या रूपाने प्रकट होत असतात, साक्षी भावाने पाहायला  लागतो, त्यावेळी  कितीतरी इतर सत्ये आपोआप प्रकट होऊ लागतात. आपले विचार, भावना, निर्णय आणि संवेदनांना चालवणारे वैज्ञानिक नियम स्पष्ट होतात. प्रत्यक्ष अनुभवातून, मनुष्य कसा पुढे जातो किंवा मागे पडतो, दुःख कसे उत्पन्न करतो किंवा स्वतःला दुःखातून कसे मुक्त करतो हे समजते. जीवनात जागरूकता वाढते, अज्ञान कमी होते, स्वतः वर नियंत्रण ठेवता येते आणि जीवनात शांततेचा सुगंध दरवळतो. या गैर-सांप्रदायिक विद्येचा उद्देश मानसिक विकारांचे संपूर्ण निर्मूलन आणि परिणामस्वरूप सर्वोच्च आनंदाला प्राप्त होणे आहे." *(dhamma.org)

विशेष म्हणजे ध्यान करणाऱ्याला ‘काहीच करायचे नाही’.  सराव विधी म्हणजे आपला श्वासोच्छवास आणि शारीरिक संवेदनांबद्दल क्षणोक्षणी, संपूर्ण समता भावाने ‘फक्त जागरूक राहणे’ हेच आहे. असे  'काहीही न करणे' अगदी सोपे वाटत असले तरी मानवी मनासाठी ही कदाचित सर्वात कठीण गोष्ट आहे. याचे कारण– मनाची सतत स्वतःला व्यस्त किंवा विचलित ठेवण्याची जुनी सवय, प्रतिक्रिया देण्याची किंवा बाह्य क्रिया-कलापांमध्ये पलायन करण्याची प्रवृत्ती इ.  डोळे बंद करून शांत बसण्याचा प्रयत्न करताच मन बंड करू लागते, भूतकाळात किंवा भविष्यात भटकायला लागते.  आनंद मिळवण्याची आणि दुःख किंवा अस्वस्थतेचा द्वेष करण्याची मनाची सततची प्रवृत्ती देखील एखाद्याला लक्षात येऊ लागते. एक महत्वाचा शोध लागतो - आपल्या मनाचा स्वभाव आणि त्याच्या सवयी. हे ‘काहीही न करणे’, जागरूक राहणे आणि प्रतिक्रिया न देण्यामुळे आपल्या सुप्त मनात खोलवर रुजलेले कर्म-संस्कार (सवयी) उभारून वर येतात. कोणताही विशिष्ट विचार, भावना किंवा अनुभवाला महत्व न देता प्रत्येक क्षणाला जे काही उलगडत आहे ते आपण फक्त साक्षी भावाने बघायला लागतो. आपला श्वास आणि शरीर ह्यांचा मनाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे जागरूक राहण्यासाठी त्यांचा उपयोग केला जातो. सतत जागरूक राहून जणू आपल्या अंतर्मनाच्या खोलवर जाऊन शस्त्रक्रिया होते व  आपल्या स्वभावात आमूलाग्र  बदल घडू लागतात .  

ज्या प्रकारे आरसा आपल्याला आपले बाह्यरूप स्पष्टपणे पाहण्याची संधी देतो, त्याचप्रमाणे विपश्यना आपल्याला आपले आंतरिक वास्तव स्पष्टपणे पाहण्याची संधी देते. 

जागरूकता आणि समता भाव ह्यांच्या संयुक्त सरावाने अंतर्ज्ञानाचा उदय होतो आणि नवीन दृष्टीकोन उलगडतात. फरक अगदी स्पष्ट दिसतो - जणु वर्षानुवर्षे धूराने अंधुक झालेली खिड़कीची काच पुसायला घेतली की थरावर-थर (अज्ञान आणि कर्म संस्कारांचे) स्वच्छ होऊ लागतात आणि सूर्य प्रकाश त्यातून अधिकाधिक तेजाने प्रकट होऊ लागतो. 'जे जसे आहे त्याला तसे' स्पष्ट पणे बघता आल्यामुळे ही यात्रा सुकर होते.

ज्याप्रमाणे अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर, सिस्टम चे संरक्षण करण्यासाठी कॉम्प्युटर स्कॅन करते, त्याप्रमाणे या  स्व-दर्शनाच्या प्रक्रियेतून सूक्ष्मातिसूक्ष्म व ऊर्जेच्या स्तरावर काम करत असलेल्या ह्या शरीर-चित्त प्रपंचाला सतत स्कॅन करता येते.

जैव-रासायनिक प्रक्रिया आणि विद्युत-चुंबकीय लहरींच्या रूपात प्रकट होणाऱ्या शारीरिक संवेदनांचा क्षणोक्षणी उदय आणि व्यय होत असतो याची जाणीव होऊ लागते.आपला प्रत्येक लहानसा विचार आणि आयुष्यात घड़णाऱ्या विविध घटना यांचा आपल्या आंतरिक वास्तवावर कसा परिणाम होतो याबद्दल आपण आता अधिक जागरूक होऊ शकतो. प्रत्येक क्षणी, आपल्याला एक पर्याय मिळत असतो - प्रिय-अप्रिय संवेदनांवर प्रतिक्रिया देणे (जी आपल्या मनाची सवय आहे) अथवा  त्यांचे साक्षी भावाने निरीक्षण करणे. सवयी चे गुलाम आणि यंत्रवत जगण्याऐवजी जागृत आणि कुशल स्वरूपाने आयुष्याची वाटचाल करता येते. वादळातही शांत राहण्याची आपली क्षमता नैसर्गिकरित्या वाढू लागते. दुःख असले तरी प्रत्येक क्षणी अनुभवाच्या स्तरावर अनित्य बोध पुष्ट होऊ लागतो, ज्यातून परिस्थितीचा स्विकार करता येतो आणि निष्काम कर्म करणे सोपे होते.

सर्वार्थाने अंतर्मनात खोलवर जाता येते. आपण जितके खोल जाऊ तितक्या खोलवर दडलेले राग, द्वेष आणि मोहाचे (अज्ञानाचे) संस्कार मुळापासून उपटून काढता येतात. ‘मुक्ती’ हे एखाद्या दुष्कर यात्रेच्या शेवटी भेटणारे फळ नसून ​ती  एक सततची प्रक्रिया आहे, ज्याची जागरूक राहून निवड करणे प्रत्येक क्षणी आपल्या हातात आहे ही  जाणीव होऊ लागते

माझ्या एका प्रदीर्घ ध्यानसत्रा दरम्यान, एक चित्र माझ्यासमोर आले–ते म्हणजे घोड्यावर बसलेला योद्धा, त्यावर सर्व बाजूंनी हल्ला, जखमी आणि रक्तबंबाळ - पराकाष्ठेची ती वेदना होती.  तथापि, काहीतरी होते ज्यातून मला जागरुक आणि निर्धास्त  राहण्याची शक्ती मिळाली. ९० मिनिटांहून अधिक मौन आणि अचल राहिल्यानंतर, जेव्हा मी माझे डोळे उघडले, तेव्हा नकळत अश्रू वाहू लागले. खोलात धरून ठेवलेले एखादे खूप जुने दुःख संपून माझ्या छाती वरचे एक मोठे ओझे हलके झाल्यासारखे वाटले.  भगवान गौतम बुद्ध यांनी २५०० वर्षांपूर्वी ही विद्या पुन्हा शोधून काढली आणि मोठ्या करुणेने संपूर्ण मानवतेच्या कल्याणासाठी तिचा प्रसार केला. विपश्यना आणि बुद्धांच्या काळापासून गुरु-शिष्य परंपरेद्वारे अनेक शतके या विद्येचे पावित्र्य राखणाऱ्या सर्व गुरूंबद्दल माझे मन कृतज्ञतेने भरून आले.

या सर्वांचा अर्थ असा आहे का, की मी आता निर्वाण प्राप्त केले आहे – माझे मित्र मला गमतीने विचारतात!  ती खूप दूरची गोष्ट आहे!  त्याऐवजी, अशी नम्र जाणीव मला आहे की पूर्ण मुक्तीचा हा मार्ग लांब आणि कठीण असला तरी एकएक करून आपल्या जुन्या संस्कारांतून मुक्त होत जाण्याची संधी प्रत्येक क्षणी माझ्या हातात आहे.

      

        ‘वयधम्मा सङ्खारा, अप्पमादेन सम्पादेथ’

"सर्व कर्म-संस्कार नश्वर आहेत, आळस न बाळगता मुक्ति च्या मार्गावर वाटचाल करत रहा"

(गौतम बुद्ध, महापरिनिर्वाण सुत्त, गाथा १८५)


ग्लोबल विपश्यना पॅगोडा, मुंबई 


विपश्यना परंपरेतील काही ठळक पैलू, ज्यांचे मला खरोखर कौतुक वाटते, ते खाली देत आहे.


  • सर्वसमावेशक– ह्यात सर्वांचे स्वागत आहे!  मानवजातीचे  दुःख कमी करण्यासाठी विपश्यना विद्येचा  सार्वजनिक उपयोग करता येईल.  वंश, धर्म, संस्कृती, सामाजिक-आर्थिक स्थिती, जाति, लिंग किंवा वय याची पर्वा न करता जो कोणी परिश्रमपूर्वक सराव करेल त्याला त्याचा फायदा नक्की होईल. तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना १० दिवसाचा विपश्यना कोर्स पूर्ण  केल्यानंतर त्यांचा स्वभावात मूलभूत सकारात्मक  बदल घडून आल्याचे  निदर्शनास आले आहे .  धर्माचे मूळ स्वरूप परोपकार आहे. ते हिमालयातील शुद्ध पाण्यासारखे आहे. जो कोणी त्याचा एक घोटही घेईल, त्याचे उत्थान होईल.


"धर्म न हिन्दू बौद्ध है, सिख न मुस्लिम जैन, धर्म चित्त की शुद्धता धर्म शांति सुख चैन” ।

—एस.एन.  गोयंकाजी


  • एक मौल्यवान भेट– धर्म खरोखरच अमूल्य आहे!  शिबिराला उपस्थित राहण्यासाठी कोणतेही शुल्क नाही.  जुने साधक, ज्यांनी ह्या शिबिरांची आणि तेथे शिकवल्या जाणाऱ्या धर्माची खोली आणि सौंदर्याचा आस्वाद घेतला आहे, त्यांच्या दानातून ह्या शिबिरांचा खर्च चालतो. जगभरात 200 हून अधिक विपश्यना केंद्रे सुरू झाली आहेत आणि असंख्य, अज्ञात लोकांच्या मनःपूर्वक दिलेल्या योगदानामुळे ती सेंद्रियपणे वाढत आहेत.


  • अनुभवात्मक– संपूर्ण मार्ग दर क्षणी बदलणाऱ्या सत्याचा साक्षात्कार घडवतो. ह्या प्रवासात सत्याचा प्रत्यक्ष अनुभव याला सर्वाधिक महत्त्व दिले जाते. सूचना आणि तात्विक  सिद्धांतांची चर्चा कमीत-कमी असून सरावातून अनुभव आणि अनुभवातून समज निर्माण करण्याचा प्रयत्न असतो.


  • वैज्ञानिक– ही विद्या वैज्ञानिक सिद्धांतांवर आधारित आहे - ह्यात आपण निसर्गाच्या नियमांना धरूनच चालतो आणि म्हणूनच ती प्रभावी रित्या कार्य करते! अनेक संशोधन-प्रकल्पां तून आधुनिक काळात  विपश्यनेची प्रासंगिकता आणि लाभ सिद्ध केला गेला आहे.


  • मूलभूत– विपश्यनेमध्ये  मानवी दुःखाचे मूळ कारण अज्ञान (अविद्या) म्हणून ओळखले जाते आणि दुःखाच्या खऱ्या स्वरूपाचे प्रत्यक्ष ज्ञान (प्रज्ञा) जागृत करून त्याचे निराकरण केले जाते.


  • कालातीत– ही विद्या देश आणि काल बंधनांच्या पलीकडे आहे. भूतकाळात पण सर्वांचे मंगल करत होती, वर्तमानात ही मंगल करत आहे आणि भविष्यात पण सर्वांचे मंगल करत राहणार आहे.


  • भक्कम पाया– ही विद्या मूलभूत नैतिक नियम (शील) आणि मनाची एकाग्रता (समाधी) यांच्या मजबूत आधारावर साधकाला अंतर्दृष्टी (प्रज्ञा) पर्यंत पोहोचवते.  हा पाया भक्कम नसल्यास, स्वतःची फसवणूक होण्याचा किंवा आध्यात्मिक मायाजाळात हरवण्याचा धोका असतो.


  • मैत्री– फक्त स्वतःची प्रगती आणि आध्यात्मिक फायद्यासाठी काम करणे हे स्वार्थी आणि अनावश्यक वाटू शकते. पण विपश्यनेसोबत नेहमी मैत्री भावनेची साधना केली जाते ज्यात आपण सर्वांसाठी मैत्री, करुणा आणि कृतज्ञतेचा भाव जागवतो. मन शांत आणि कोमल होते आणि आपल्याच स्वार्थासाठी काम न करता पूर्ण मानवजातीच्या सुखासाठी काम करताना मैत्रीचे तरंग आपल्या मन, वाचा आणि कृतिद्वारे सभोवताली पसरतात.


  • आत्म-निर्भरता आणि अनुशासन– ही विद्या साधकांनी आत्मनिर्भर होण्यावर जोर देते. ही व्यक्तिनिष्ठ किंवा एखाद्या गुरूंवर भर देणारी साधना नाही तर स्वेच्छेने पत्करलेले नियम आणि अनुशासन पाळत आपली प्रगती  स्वतः साधण्याचा मार्ग आहे.


“प्रयत्न तुम्ही स्वतः करायचा आहे,  बुद्ध फक्त मार्ग दाखवतात.”

–गौतम बुद्ध, धम्मपद, गाथा २७६


महत्वाची सूचना:

10 दिवसांचा कोर्स पूर्ण केल्याशिवाय विपश्यनेचा सराव करणे उचित नाही, "ही विद्या (विपश्यना) केवळ अशाच शिबिरामध्ये शिकली पाहिजे जेथे साधनेला लागणारे योग्य वातावरण आणि प्रशिक्षित मार्गदर्शक असतील. ध्यान ही एक गंभीर बाब आहे,  विशेषत: विपश्यना ध्यान, जे अंतर्मनाशी संबंधित आहे म्हणून विपश्यनेकडे  बघण्याचा दृष्टिकोण कधीही उथळ किंवा वरवरच्या स्तरावर असू नये"  ('आर्ट ऑफ लिव्हिंग' या पुस्तकात विल्यम हार्ट)

विपश्यना ध्यानाबद्दल अधिक माहितीसाठी आणि/किंवा 10-दिवसीय अभ्यासक्रमांसाठी नोंदणी करण्यासाठी, कृपया येथे भेट द्या:

www.dhamma.org

www.vridhamma.org


लेखक :  

विपुल अभय शहा, बारामती, महाराष्ट्र

मनोविकास आणि शिक्षणतज्ञ व मानसिक समुपदेशक 

vipul.shaha@post.harvard.edu


भाषांतर:  शुभा मेहरोत्रा